About the Book
एका वाचकाने केलेले “अभिनंदन” एका श्वासांत वाचून काढल्या सार्या कविता. सुंदर, अतिसुंदर! पुन्हा पुन्हा वाचाव्या, दुसर्यांना सांगाव्या, चित्रांकित कराव्या, स्वरबद्ध करून गात राहाव्या अशाच आहेत सर्व कविता! ’गिरकीवर गिरकी घेत’, ’पायाखालच्या वाटा चाचपडत’, सत्याचे घुंगरू लावून अवतरलेली ही ’हिमकन्यका’ आहे? की ’राजकन्येचा झगा घालून’, ’सात पांढर्या घोड्यांचे लगाम हाती घेऊन’ रथारूढ होऊन दौडत जाणारी ’नव-जन्मा’ आहे? ’मोकळा झालाय श्वास’, ’सुट्या झाल्यात खेचलेल्या नसा’, ’गळून गेलेत सर्व पाश’, आणि म्हणून ’उडायला तयार’ आनंदाने, कारण ’क्षितिज गाठायची’ ओढ आहे, ’आकाशाकडे भरारी’ आहे! ’स्वतःचीच स्वतःला साक्ष ठेवून’, ’काळीज भरभरून’, ’कोमल प्रसन्नता आणि ऊबदार कृतज्ञता’ वाहत आहे प्रत्येक कवितेतून. ’खडकांच्या फटींतून’ श्वास घेणारा इवलासा जीव आता ’एकाच ओंजळीत’ आयुष्याची सर्व देणी-घेणी घेऊन, ’अव्यक्त विश्वांत’ ’एकांताच्या नितळ प्रकाशात’ ’अंतरंग कोळून’, ’एकसंध’पणे पूजा करीत आहे. ’घट्ट धरलेल्या धीराची केविलवाणी पानगळ’, ’आत्मसन्मानाचा शेवटचा उरलेला थेंब’, ’सर्वत्र समतोल जमवण्याच्या’ अनुभूतीवर आधारलेल्या ह्या कविता अगदी चार-चार ओळींच्याही वाचत असताना ’वाSS, वाSS’ अशी दाद घेतात. शब्दाशब्दांत हळुवार कोमलता आहे. विचारांची प्रांजळता मानवी प्रज्ञेच्या पलिकडे आहे. ’तू विधाता, तुझाच एक अनुभव मी’ किंवा ’समाधी मी’ म्हणत आत्म्याचा स्पर्श देत, चैत्याचा स्वप्रकाश पसरवीत प्रत्येक कविता ओजसीची ओजस्विनी बनत शक्तिशाली झाली आहे.
Details
- Title: Dene Jagan Mateche
- ISBN: 978-81-944648-6-0
- Format: Paperback
- Date of Publication: 10 Jun, 2020
- Language: Marathi
- Category: Poetry